शिवपूजन - 2022, पुणे

निवेदन पत्रिका
धर्मप्रेमी सज्जन,
अनुष्ठान ही भारतीय संस्कृतीतील अतिशय महत्त्वपूर्ण व हृद्य अशी गोष्ट आहे. शरीर आणि मन दोन्हींना आपल्यात गुंतवून ठेवण्याचे सामर्थ्य तिच्या ठायी आहे. त्यामुळे इकडे तिकडे भटकणाऱ्या चित्त वृत्ती आपोआपच स्थिर आणि शांत होतात. परिणामतः सत्त्वगुण वृद्धिंगत होतो. त्यातुन श्रावणमासात असे अनुष्ठान करता व अनुभवता आले, तर सात्त्विकतेचा परिपोष काय विचारावा?
येत्या श्रावणमासात पुण्यात ही पर्वणी चालून आली आहे गंगाखेड निवासी बहुसोमयाजी
श्री यज्ञेश्वर रंगनाथ सेलूकर महाराज यांच्यामुळे, संपूर्ण श्रावणमासात कोटी-लिंगार्चन होणार आहे. यानिमित्ताने आम्ही आपणास थोडक्यात निवेदन करीत आहोत.
समस्त मानव समाज, समस्त पर्यावरण एवढेच नव्हे तर, समस्त ब्रह्माण्डाचे सुनियोजित चक्र ज्या विविध शक्ती चालवत आहेत, त्यांना वैदिक ऋषींनी ‘देवता’ असे संबोधले आहे. अशा अनेक शक्ती आहेत, त्यांचा एकत्वेन व्यवहार केलेला आढळतो. त्याचे सर्वात मोठे उदाहरण म्हणजे, एक व्यक्ती समाजात विविध भूमिका निभावत असते. त्यांस पिता, पती, पुत्र आदी अनेक नावाने संबोधले जाते. तसेच एकच दैवी शक्ती विविध रूपात या सृष्टीचे पालन, पोषण व संहार आदी अनेक भूमिका निभावत असता, विविध नावाने संबोधली जाते हाच भाव वैदिक मंत्रात स्पष्ट केलेला आहे.
“एक एव रुद्र: अद्वितीय:” “असंख्याता सहस्त्राणि ये रुद्रा अधिभूम्याम्” “परोक्षप्रिया वै देवाः”
या उक्तीप्रमाणे काही देवता प्रत्यक्ष तर काही देवता अप्रत्यक्ष स्वरूपात असतात. जसे आपल्या अध्यात्म इंद्रियांना कार्यरत राहण्यासाठी आहारजन्य ऊर्जेची आवश्यकता असते. तसेच समाजात विविध रूपाने दैवी शक्ती कार्य करीत असता त्यांना ही पुष्ट करण्याची आवश्यकता असते. या दैवी शक्ती परोक्ष रूपात असल्याने त्यांना पुष्ट कसे करावे हा मोठा प्रश्न आपल्यापुढे येतो. सनातन धर्मातील काही ग्रंथामध्ये या शक्तींना पुष्ट करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. यात विविध यज्ञप्रयोग असतील तर काही मंत्रोपचारासहित अभिषेकादि अनुष्ठान पद्धती असतील, हे सर्व प्रयोग ऋषींनी समस्त सृष्टी कल्याणासाठी निर्देशिले आहे.
अर्थात वरील अनेकानेक उपाय विविध काळात करायला सांगितले आहेत. श्रावणमासातील लिंगार्चनाभिषेक अनुष्ठानाद्वारे शिवशक्तीला जागृत करून समस्त समाजाचे कल्याण करण्याचा उपाय ऋषींनी सांगितला आहे.
शिवलिंग हे निर्गुण, निराकार, सर्वव्यापी, अनादि, अनंत असे परमतत्त्व आणि उपासनेसाठी लागणारे सगुण आलंबन (आधार) यांचे एक आश्चर्यकारक मिश्रण आहे. सर्वव्यापी आणि अनादि अनंताचे प्रतिक असणे, हा या मागचा विचारच ‘अद्भुत’ आहे. लिंगपुराणातील कथा यासाठी प्रसिध्द आहे. ज्यावेळी ब्रह्मदेव व भगवान विष्णू यांच्यात श्रेष्ठत्वावरून वाद निर्माण झाला. तेंव्हा जलातून एक अग्निस्तंभ प्रकटला. त्याचे वरचे टोक शोधण्यासाठी ब्रह्मदेव हंसरूपाने आकाशात व त्याचे खालचे टोक शोधण्यासाठी भगवान विष्णू वराह रूपाने समुद्रात खाली गेले, पण त्या अग्निस्तंभाचे आदि ना अंत काहींच कळून आलं नाही, हेच शिवतत्त्वाचे लिंगरूप होय.
लिंग म्हणजे खूण किंवा चिन्ह. हा वैशिष्टयपूर्ण आकार अनादि, अनंत व सर्वव्यापी, तत्त्वाचे चिन्ह होय ‘चिन्ह’ हे चिन्हिताकडे जाण्याचा मार्ग दाखवते तसे ‘शिवलिंग’ हे चिन्ह ‘शिवतत्त्वाकडे’ जाण्याचा मार्ग दाखवते. ‘लिंग’ या शब्दाचा आणखी एक अर्थ म्हणजे ज्याच्या ठायी सर्व विलीन होते, ते ठिकाण होय सर्व वस्तुजात अंततः शिवतत्त्वाच्या ठिकाणी विलीन होते, हा याचा अभिप्राय.
शिवतत्त्वाच्या पूजनाची परंपरा आपल्याकडे अति प्राचीन काळापासून सुरू आहे. अगदी मोहें-जो-दाडो येथील उत्खननात सापडलेल्या तीन मुखे आणि शिंगे असलेल्या मूर्तीवर पाच-सहा अक्षरांच्या लेखांच्या समाधानकारक अर्थ लागला नसला तरीही विद्वानांच्या मते याचा अर्थ शिवपूजनासी जोडलेला दिसतो. तसेच टेरिकोटा (कलीबंगान) येथे अनेक शिवलिंगे सापडली आहेत.
ऋग्वेदात रुद्रसूक्ते किंवा रुद्राचे संदर्भात माहिती कमी प्रमाणात असली तरीही यजुर्वेदात रुद्राचे संदर्भ यज्ञप्रक्रियेतील ‘अग्निचयन’ प्रयोगात विस्ताराने दिसतात. कृष्णयजुर्वेदीय-तैत्तिरीय संहितेच्या सात कांडापैकी चौथे व पाचवे अशी दोन कांडे अग्निचयन मंत्र व ब्राह्मण मंत्रासाठी खर्ची पडलेली आहेत. रुद्र आणि वैदिक धर्मावर यांच्या मध्ये अशा प्रकारचा अत्यन्त आंतरिक संबंध आहे.
“रुद्रो वा एष अग्निः तस्यै ते तनुवौ घोराSन्या शिवाSन्या” (तैत्तिरीय संहिता 5.7 3.9)
म्हणजे रुद्राची दोन स्वरूपे आहेत. घोर म्हणजे भयंकर आणि शिव म्हणजे सौम्य, कल्याणकारक. अग्नी किंवा सूर्य हे रुद्राचे रूप आणि यांत तेज असलेला चंद्र हे शिवाचे रूप असे वेदाने प्रतिपादिले आहे.
रुद्र-शिव त्या वैश्विक चैतन्याचीच म्हणजेच पर ब्रह्माचीच रूपे आहेत.
“ब्रह्म शिवो मे अस्तु सदाशिवोम्”- तैत्तिरीय आरण्यक (10.47) असा उल्लेख आढळतो.
शैव संप्रदायानुसार सृष्ट्यादिक्रियाकारित्व हा शिवदेवतेचा विशेष स्वभाव आहे. सृष्टी, स्थिती, संहार, विलय आणि अनुग्रह या शिवाच्या पाच क्रिया आहेत. माया ही शिवाचीच सृष्टी उत्पन्न करणारी शक्ती आहे. म्हणून श्वेताश्वतर उपनिषदाने (4.10) मायेस ‘प्रकृती’ असे म्हटले आहे. सद्योजात, वामदेव, अघोर, तत्पुरूष आणि ईशान अशी शिवदेवतेची पाच मुखे प्रसिध्द आहेत. सांख्याने महाभूते, सूक्ष्मभूते, ज्ञानेंद्रिये, कर्मेद्रिंये आणि तन्मात्र यांच्याशी या पाच मुखाचा संबंध असल्याचा सिध्दांत मांडला आहे. हा सिध्दांत म्हणजे शिव हे सर्वात्मक चैतन्यतत्त्व असून हे विश्वसुध्दा शिवापासून आविष्कृत झाले आहे, हे स्पष्ट आहे.
शिव-लिंगार्चन हे अतिप्राचीन आहे, रामेश्वर हे शिवलिंग प्रभू रामचंद्रानी स्थापिलेले आहे. संपूर्ण भारतवर्षात बारा ज्योतिर्लिंगे प्रसिध्द आहेत. 1) सोमनाथ, 2) मल्लिकार्जुन 3) महाकाल, 4) ओंकारेश्वर, 5) केदारनाथ, 6) भीमाशंकर, 7) विश्वेश्वर, 8) त्र्यंबकेश्वर, 9) वैजनाथ, 10) नागनाथ, 11) रामेश्वर, 12) घृष्णेश्वर, याशिवाय हजारो प्राचीन शिवमंदिरे भारतभर आहेत. शिवलिंगाना ‘ज्योतिर्लिंग’ म्हणतात, कारण ती तेजस्वरूप आहेत. ऊर्जास्रोत आहेत. वैज्ञानिक विचाराप्रमाणे या प्रत्येक ठिकाणी प्राचीनकाळी ज्वालामुखी होते.
भारताबाहेर सुध्दा अनेक ठिकाणी शिवलिंगे व शिवमंदिरे सापडतात. व्हिएतनाममधील 9 व्या शतकातील एक अखंड शिवलिंग उत्खननात सापडले आहे. कंबोडीया, जावा, सुमात्रा, इराक, इराण या देशात सुध्दा अनेक मंदिरे व शिवपिंडी सापडल्या आहेत. विविध कामनासाठी विविध प्रकारच्या शिवलिंगाचे शास्त्रात विधान आढळते, माती, पारा, विविध धातू, रत्ने, पाषाण यांचीही शिवलिंगे आढळतात.
नर्मदेतील बाणलिंग किंवा बाण मोठया प्रमाणात पूजेत असतो. शिवलिंगाचे दोन भाग असतात. म्हणजे पीठ किंवा जलाधारी याच भागाला ‘शाळुंखा’ असेही म्हणतात. आणि त्यावर अधिष्ठित असलेली अंडाकृती पिंड, जी स्वयंभू लिंगे आहेत. ती प्रायः अशाच आकारात आहेत. दक्षिण भारतात पंच महाभूताची पाच शिवलिंग स्थाने प्रसिध्द आहेत. शिवकांची येथे ‘पृथ्वीतत्त्वलिंग’, जबुंनाथ येथे ‘जललिंग’, अरुणाचल येथे ‘तेजोलिंग’, कालहस्ती येथे ‘वायुलिंग’ आणि चिदंबर येथे ‘आकाशलिंग’ अशी शिवलिंगे आहेत.
प.पू. यज्ञेश्वर रंगनाथ सेलूकर महाराज यांच्या घराण्यात कोटी लिंगार्चन साधनेची 100 वर्षाची परंपरा असून, श्रौत अग्निहोत्राची सुध्दा गेल्या चार पिढ्यांची (100 वर्षे पेक्षा जास्त) परंपरा आहे. योगायोग म्हणजे प.पू. यज्ञेश्वर महाराजांचे वडील गवामयन सत्रयाजी रंगनाथ कृष्ण सेलूकर महाराज यांचे हे ‘जन्मशताब्दी’ वर्ष आहे. ही आपल्या सर्वांसाठी एक उत्सवाची पर्वणी आहे.
या श्रावणमास शिवपूजन सोहळ्यात प्रतिदिन प्रदोषकाळी वेदमंत्राने अभिषेकपूजन, बिल्वार्चन, नित्यअग्निहोत्रहोम, दर्शपौर्णमासयाग (श्रौत यज्ञ). तसेच प.पू. स्वामी गोविंददेवगिरीजी महाराज (आचार्य किशोरजी व्यास) यांचे विशेष आशीर्वचन, पंडितप्रवर प.पू. श्री. गणेंश्वरशास्त्री द्राविड (काशी), भागवताचार्य वे.शा.सं. अनंतशास्त्री मुळे-गोंदीकर (आळंदी), संत साहित्याचे जेष्ठ अभ्यासक, साहित्यिक विद्यावाचस्पती डॉ. रामचंद्र देखणे, डॉ. रघुनाथ शुक्ल (जेष्ठ संशोधक, एन्.सी.एल), कुलगुरु डॉ .गो. बं. देगलूरकर, डॉ. भाग्यलता पाटसकर, डॉ.रवींद्र मुळे आदि विद्वानांची व्याख्याने, प्रवचने, कीर्तने, भजने, नित्त्य अन्नदान इत्यादी कार्यक्रमांचे आयोजन केले आहे.
सर्व धर्मप्रेमी बंधु-भगिनींना विनम्र आवाहन आहे की, आपण वरील धर्मकार्यात, तन-मन-धनाने सहभागी होऊन या अनुष्ठानाचा लाभ घ्यावा, ही विनंती.
सहभागी होण्या साठी कृपया येथे क्लिक करा आणि आपली माहिती द्या
आपले ,
श्रावणमास शिवपूजन सेवा समिती, पुणे.
संपर्क : मो.: 9890901788, 9822213283, 8308840996, 9422331196, 9373332498
स्थळ : महेश सांस्कृतिक भवन, 62/2,
बी/2बी, कोंढवा (बु) अप्पर इंदिरानगर शेवटचा बस स्टॉपजवळ,
पुणे- 411062, 020-26962359
कालावधी : श्रावण शुध्द प्रतिपदा शके 1944 ते भाद्रपद शुध्द प्रतिपदा शके 1944
दिनांक : 29 जुलै 2022 ते 28 ऑगस्ट 2022
देणगी खात्याचे तपशील:
A/C Name :-Maharshi Yadnyvalkya Sanskrut Vidya PratishthanAC Number:-007230100003326
IFSC Code:- JSBP0000007
Karve Road, Pune
Account type-Current
देणगी QR Code:
